देसाई कारखान्याची गाळप क्षमता शंभर ग्रॅमने तरी वाढली का?
युवा नेते सत्यजितसिंह पाटणकरांचा सवाल
पाटण, दि. 1 : आ. शंभूराज देसाई तुम्हाला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी भलत्याच गोष्टी बोलू लागल्याने तुमची पक्षनिष्ठा व नेत्यांचा तुमच्यावरील विश्वास स्पष्ट झाला आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांची येणाऱ्या निवडणुकीत मदत मिळावी म्हणूनच त्यांच्या नावाचा गजर करत आमच्यात मतभेद निर्माण करून स्वतःची पोळी भाजून घेण्याचा तुमचा प्रयत्न न ओळखायला तालुक्यातील जनता खुळी नाही. जर मतदारसंघात खरोखरच कोट्यावधीचा विकास केला हे छातीठोकपणे सांगता तर मग अशी सहानुभूती मिळविण्याची दयनीय वेळ तुमच्यावर का आली? पूरक प्रकल्प तर सोडाच पण अनेक वर्षे ताब्यात असलेल्या देसाई कारखान्याची गाळप क्षमता शंभर ग्रॅमने तरी वाढली का? असा सवाल युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी पत्रकाद्वारे लगावला.
पत्रकात सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, तुम्ही खरोखरच एवढा मोठा विकास केला आहे तर मग येणाऱ्या निवडणुकीत मतदार तुम्हाला पुन्हा पाडतील अशी भिती का वाटते? याच भितीपोटी जाईल त्याठिकाणी आम्हा पिता-पुत्रांचा नामोल्लेख केल्याशिवाय चैन पडत नाही. जिथे जावून तुम्ही पाटणकरांची मापे काढता तिथे जाताना विक्रमसिंह पाटणकर यांनीच केलेल्या रस्त्यावरूनच जावे लागते याचा विचार करा. आमच्या साखर कारखान्याची चिंता तुम्ही अजिबात करू नका. तेवढा विश्वास आम्ही नक्कीच कमावला आहे व आमच्या ताब्यातील संस्था, प्रकल्पातून तो आम्ही सिध्दही करून दाखविला आहे. देसाई साखर कारखाना तुमच्या ताब्यात येवून अनेक वर्षे झाली तरी पुरक प्रकल्प तर सोडाच पण त्याची गाळप क्षमता अगदी शंभर ग्रॅमने तरी वाढवली का? हे एकदा जाहीर करा. प्रश्न राहिला त्या कारखान्यात तुम्हाला मिळालेल्या बहुमताचा यासाठी तुमचे कौतुक करावेच लागेल कारण मागच्या दाराने स्वतःच्या गटाचे बिगर ऊस उत्पादक हजारो सभासद करणे, आमच्या विचारांच्या सभासदांचे सभासदत्व जाणीवपूर्वक रद्द करणे, त्यांच्या वारसनोंदी न करणे, यातूनच मिळालेले तुमचे मताधिक्य तुम्हालाच लखलाभ. यातून शेतकरी, कामगार व सभासदांचा काय फायदा केला ते जरा समोर आणा. हिम्मत असेल तर हे बिगर ऊस उत्पादक सभासद बाजूला काढा. राजकीय आकसातून व पराभवाच्या भितीपोटी आमचे कमी केलेले सभासद घेऊन वारसनोंदी करून या रिंगणात मग तुम्हाला तुमचे कर्तृत्व अनुभवायला मिळेल, असा टोलाही त्यांनी लगावला.
विक्रमसिंह पाटणकर यांना जनतेने लोकप्रतिनिधीत्व दिले होते. सन 1983 ते 2004 व पुन्हा 2009 ते 2014 अशा तब्बल सहा वेळा आमदार व एकवेळ मंत्री होण्याची संधी त्यांना पक्षाने व जनतेने दिली. त्यावेळी त्यांनी समाजकारण केले. तुमच्यासारखी जागोजागी जावून मापे काढण्यात वेळ घालवला नाही. तुमचा कोट्यावधी रूपयांचा विकासाचा दावा असेल तर जनता बहुमताने निवडून देईल. मात्र तुम्हाला चांगलेच माहित आहे नक्की वस्तुस्थिती काय आहे ते. म्हणूनच तुम्हाला गावोगावी, गल्लीबोळात फिरून पाटणकर पिता-पुत्रांचा नामोल्लेख करावा लागतो आणि स्वतःच्या पूर्वजांची महती सांगावी लागत आहे, असेही शेवटी सत्यजितसिंह पाटणकर यांनी शेवटी पत्रकात स्पष्ट केले आहे.
चौकट
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आयोध्येला जातात मग तुम्ही का नाही?
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख हर्षद कदम आयोध्येला जातात. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीला जावून त्यांना अभिवादन करतात. तर मग आ. देसाई तुम्ही का नाही? सेना तुम्हाला बोलावत नाही का. तुमच्या निष्ठेवर त्यांना शंका आहे? असा प्रश्न निर्माण होतो आणि तो विचारला की तुम्हाला राग येतो यात आमचा दोष काय? असेही सत्यजितसिंह पाटणकर म्हणाले.

Comments
Post a Comment